मुंबई : अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले. त्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करून शर्मा यांच्या वैद्यकीय स्थितीबाबत सर्वसमावेशक अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना दिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटके आणि गाडीचे मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना १७ जून २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. शर्मा गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील सरकारी रुग्णालयात दाखल आहेत.
त्यांची वैद्यकीय अँटिलिया बॉम्ब प्रकरण तपासणी करण्याची मागणी करणारा अर्ज एनआयएने गुरुवारी विशेष एनआयए न्यायालयात केला आहे. शर्मा यांना कोणताही आजार नसून ते तंदुरुस्त आहेत. आजारपणाच्या नावाखाली ते सरकारी रुग्णालयाचा गैरवापर करत असल्याचा दावा एनआयएने केला. हा दावा शर्मा यांनी फेटाळून लावला. त्यांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार दिले जावेत, अशी विनंती केली. दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने आधी शर्मा यांची वैद्यकीय चाचणी घ्या, असे स्पष्ट केले.
