कठुआ : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हटली मोडवरून भारत जोडो यात्रेचा या राज्यातील प्रवास शुक्रवारी सुरू झाला. काश्मीरमधील यात्रेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. यावेळी पावसानेही हजेरी लावल्यामुळे राहुल गांधींनी प्रथमच आपल्या पांढऱ्या टी-शर्टवर जॅकेट घातले होते आणि त्याचीच चर्चा होती.
भारत जोडो यात्रेने गुरुवारी संध्याकाळी पंजाबमधून जम्मू- काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. दोन्ही राज्यांच्या काँग्रेस अध्यक्षांनी ध्वजाचे आदान-प्रदान केल्यानंतर यात्रा सीमेवरच मुक्कामी थांबली होती. शुक्रवारी कठुआ जिल्ह्यातील हटली मोडवरून यात्रेचा काश्मीरमधील प्रवास सुरू झाला.
पावसाने व्यत्यय आणला असला तरी राहुल यांनी आपल्या समर्थकांसह यात्रेच्या अखेरच्या टप्प्याला उत्साहात सुरुवात केली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने राज्यसभा खासदार संजय राऊत यात्रेत सहभागी झाले. देशातील वातावरण वेगाने बदलत असून, लोक त्यांचा नेता ठरवतील, असे राऊत म्हणाले. राज्यातील इतर नेतेही यात्रेत सहभागी झाले. जम्मू- पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या यात्रेला बघण्यासाठी काश्मिरी लोकांनीही मोठी गर्दी केली आहे. काँग्रेसने यात्रेचा काश्मीरमधील मार्ग अद्याप जाहीर केलेला नाही. काश्मीरच्या आतील मार्गांवरून अथवा राष्ट्रीय महामार्गावरून यात्रा नेऊ द्या, असे दोन पर्याय आम्ही प्रशासनाला दिले आहेत.
यांपैकी कोणत्या मार्गासाठी परवानगी द्यायची, याचा निर्णय प्रशासन आणि सुरक्षा संस्थांनी घ्यायचा आहे, असे प्रदेश काँग्रेसकडून सांगण्यात आले. यात्रेसाठी स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांसह चोख सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. काँग्रेसच्या यात्रेला सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले. भारत जोडो यात्रेचा हा शेवटचा टप्पा आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारीहून ७ सप्टेंबरला सुरू झालेल्या यात्रेचा श्रीनगरमध्ये ३० जानेवारी रोजी समारोप होईल.
