सिन्नर : तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी शिवारातील जमिनीचा अकृषक कर भरण्याबाबत सिन्नरच्या तहसलीदारांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यासह तालुक्यातील १२०० मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. येत्या दोन दिवसांत संबंधित कराचा भरणा करण्यात येणार असल्याचे ऐश्वर्या राय यांच्या वतीने कळवण्यात आले आहे.
ऐश्वर्या राय यांनी सन २००७- ०८ मध्ये आडवाडी शिवारात गट क्रमांक १२६ मधील १ हेक्टर २२ आर जमीन स्वतःच्या नावावर घेतली असून सध्या त्या जमिनीवर सुझलॉन पॉवर कंपनीची पवनचक्की आहे. त्याचप्रमाणे आणखी काही कंपन्यांच्या पवनचक्क्याही या परिसरात आहेत. राय यांच्या जमिनीचा सन २०२२-२३ चा २१ हजार ९६० रुपये इतका अकृषक कर भरण्याची नोटीस ऐश्वर्या राय बच्चन प्रोप्रा. फर्म या नावाने काढण्यात आली असून नोटिसीचा खर्च म्हणून १० रुपयांची आकारणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अधिनियमान्वये खातेदारास नमुना १ अंतर्गत ही सिन्नरमधील जमिनीचा अकृषक कर भरण्याची सूचना नोटीस बजावण्यात आल्याचे तहसीलदार एकनाथ भंगाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
९ जानेवारी रोजी ही नोटीस बजावण्यात आली असून त्या तारखेपासून १० दिवसांच्या आत कर शासनजमा न झाल्यास अतिरिक्त शास्तीसह रकमेच्या वसुलीसाठी सक्तीची कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारात डोंगराळ शिवारात अनेक पवनचक्क्या उभारल्या असून सुझलॉन कंपनीने अनेक बड्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीतून या परिसरात पवनऊर्जेचे मोठे जाळे उभे केले आहे. यात मोठे राजकीय नेते,अभिनेत्यांचा समावेश असून नगर जिल्ह्यातही प्रख्यात क्रिकेटपटूंनी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. सिन्नर तालुक्यात एकूण १२०० अकृषक मालमत्ताधारकांना कर भरण्याबाबत नोटिसा काढण्यात आल्या असून यात अग्रो व्हेंचर्स, रामा हँडीक्राफ्ट, बिंदू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रा.लि., मेटकोन इंडिया, सी. जे. पटेल आणि कंपनी, राजस्थान गम प्रा. लि., एल. बी. कुंजीर इंजिनीयर प्रा. लि., एस. के. शिवराज, आय. टी. सी. मराठा लि., हॉटेल लीला व्हेंचर लि. आदी कंपन्यांचा समावेश आहे.
.png)