२०२४ च्या लोकसभेसाठी भाजपची धुरा नड्डांच्याच हाती ॥ पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४पर्यंत वाढवण्यात आला आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कार्यकारिणीने सामाजिक व आर्थिक ठराव मंजूर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक ठराव मांडला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.
भाजपाध्यक्ष म्हणून नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. हा प्रस्ताव सर्वसंमती मंजूर करण्यात आल्याचे अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजप अधिक लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे.
जनसंघाच्या स्थापनेपासून आतापर्यंत भाजपमध्ये बूथ पातळीसह राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पक्षाच्या राज्यघटनेनुसार झाली आहे, असे शाह म्हणाले. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लढलेल्या निवडणुकांमधील विजयाबद्दल शाह यांनी कौतुक केले. केंद्र सरकारच्या योजना पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचे मतांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी नड्डा यांनी पार पाडली. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात आणि नड्डांच्या अध्यक्षतेखाली भाजप आगामी सार्वत्रिक निवडणुकी तगत निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने विजयी होईल, असा दावा शाह यांनी केला.
भाजपाध्यक्ष म्हणून सलग दुसरा कार्यकाळ मिळणारे नड्डा हे पक्षातील तिसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी लालकृष्ण अडवाणी आणि अमित शाह यांना सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. राजनाथ सिंह दोन वेळा भाजपाध्यक्ष राहिले होते. मात्र त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता. जे. पी. नड्डा यांना जून २०१९ मध्ये कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले होते. यानंतर ३० जानेवारी २०२० रोजी ते पूर्णकालिक अध्यक्ष झाले. येत्या २० जानेवारीला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. तो आता जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. पुढील वर्षी जून महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका होतील. याचाच अर्थ यावर्षी होणाऱ्या ९ राज्यांमधील विधानसभा निवडणूक आणि पुढील वर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक भाजप नड्डाच्यांच अध्यक्षतेखाली लढेल. हिमाचल प्रदेश ही कर्मभूमी असलेल्या नड्डा यांची जन्मभूमी बिहारचे पाटणा आहे.
